माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, १० जानेवारी, २०१६


आयुष्य अन नातं...

नात्यांचं आयुष्यात असणं नसणं,
पाणी अन माशांसारखं असतं...
नात्याचं पाणी आटलं तर,
आयुष्य माश्यासारखं तडफडतं...

आयुष्य ह्रदय असेल तर,
नातं त्याचा श्वास असतं...
श्वास कोंडला, संपला की,
आयुष्यही संपून जात असतं...

आयुष्य  चंद्रकोर असलं तर,
नातं आंधारी रात्र असतं...
कोणी एक सोबत नसलं तर
दुसऱ्यालाही शोभत नसतं...

नात्याचं दुसरं नावच आयुष्य असतं,
जणू आयुष्याची जीवनगाठच असतं
गाठ तुटली अन सुटली की,
आयुष्य संपल्यासारखंच वाटतं...

गणेशदादा शितोळे
१० जानेवारी २०१६



शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

बोलगाणी मुकी झाली....










                           काल सकाळी पाडगावकरांच्या निधनाची बातमी समजली अन डोळ्यातून पाणी आलं. मंगेश पाडगावकर हा महाराष्ट्रातला एक अवलिया.  संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कवितांमधून प्रेम करायला शिकवणारा. प्रेमाची एक वेगळीच भाषा सोप्या शब्दात समजावून सांगणारा. 
                    आज प्रेम म्हटलं की एक मुलगा-मुलगी अन त्यांचा तो फिल्मी अंदाज यापलिकडे आपल्याला काही आठवत नाही. याच आपल्या कल्पनेला आपल्या शब्दांतून छेद देणारा एक कवितेचाही बाप कवी. अवघ्या महाराष्ट्राला मंगेश पाडगावकर या वादळानं एक अनोखं प्रेम करायला शिकवलं. प्रेम करायचं स्वतःवर, प्रेम करायचं दुसर्‍यावर अन प्रेम करायचं माणसाने माणसावर. प्रेम करायचं निसर्गावर. मंगेश पाडगावकर यांच्या मते जगातील प्रत्येक गोष्टीत प्रेम आहे. अगदी पृथ्वीच्या गाभ्यातही. पृथ्वीचा जन्मही प्रेमाने झाला आहे अन अस्तही प्रेमानंच होणार आहे. आधात्म, संस्कृती आणि धर्माच्या नावाखाली प्रेमाची टिंगल उडवणाऱ्यांना आपल्या "यांच असं का होतं का कळत नाही" या कवितेतून सडतोड उत्तर देणारा हा कवी विविध अंगी प्रेमाची व्याख्या शिकवून गेला. 
पाडगावकरांच्या सोप्या भाषेतल्या कविता गाणी झाली अन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिली.  
                       'तुझी नी माझी भेट जहाली, प्रेम म्हणजे प्रेम असतं, बघणार्‍या माणसांना अशा कितीतरी कविता गाणी झाली. याच संकल्पनेतून पाडगावकरांनी साकरलं होता एक कविता संग्रह "बोलगाणी" अगदी सहज आणि सोप्या भाषेत. जणू निबंध वाटावा असाच. 'मन मोकळं मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखरासारंखं उडायचं' म्हणत ही बोलगाणी प्रत्येकाला आपली वाटायची.  
                 दुःखालाही कविता नावाचा नामी उतारा असतो हे शिकवलं तर पाडगावकरांनीच. जगात अनेक शोध लागले, रिसर्च झाले अन नोबेल पारितोषिकं मिळाली. पण आजवर न लागलेला दुःखाचा उतारा या मराठी माणसाने शोधून काढला. त्याला कधी पुरस्कारची गरज पडली नाही. आपल्या कवितेवर प्रेम करणारी माणसं भेटली तीच त्यानं पुरस्कार मानून घेतली होती.  
                              डिप्लोमा संपल्यावर सुट्टीमधे पुण्यात कॉलेज फिरून पहाताना बालगंधर्व मधे एकदा काव्य मैफिलीत जाण्याचा योग आला होता. त्यावेळी झालीली मंगेश पाडगावकर यांची भेट माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देणारी ठरली. बालगंधर्वमधली मैफल संपल्यावर पाडगावकरांना भेटण्याचा योग आला. लेखकमित्र विनीत कुलकर्णी, चिन्मय महाजन यांच्या सह आमचा ग्रुप बॅकस्टेजला पाडगावकरांना भेटायला गेलो होतो. जेव्हा पहिल्यांदा या माणसाला पाहिलं तेव्हा तो इतका आपल्याला वाटला की जणू घरचाच आप्त परिवारालाच आहे. फ्रेंच कट, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा अन एकदम विनम्र. कोणी मोठा सेलिब्रिटी झालो आहे असा आव नसणारा एक वयस्कर गृहस्थ. भेटल्यावर आम्ही सगळ्यांनी पाडगावकरांचं अभिनंदन केले. त्यानंतर काव्य मैफिलीत गायलेल्या त्यांच्या कवितांवर चारपाच मिनिटे चर्चा झाली. याच काव्य मैफिलीत त्यांनी "" ही कविता सादर केली होती. या कवितेत सुरवातीला पाडगावकर असं म्हणतात की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं असं म्हटलं की लोकांना प्रेम थिल्लर वाटतं. अन लिखाण कवितेच्या दृष्टीने चिल्लर वाटतं. आम्ही बोलता बोलता पाडगावकरांना हाच प्रश्न विचारला की,
" सर तुम्हाला अशी भीती कधी वाटत नाही का की आपलं हे लिखाण लोकांना आवडेल नाही आवडेल..?" 
आमच्या या प्रश्नावर पाडगावकरांनी सुंदर उत्तर दिले.  
                 "मुळात लेखक कवी यांनी लोकांना काय आवडते म्हणून लिहायचं नसतं, स्वतःला काय वाटतं ते शब्दांत उतरावायचं असतं. कोणाला वाटेल थिल्लर तर वाटू द्या. कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार. आपण नाही विचार करायचा. आपण फक्त व्यक्त व्हायचं असतं" 
                        पाडगावकरांचे हे शब्द अन ती भेट आयुष्याला वेगळं वळण देणारी ठरली. मी जे आज लिहितो त्यामागची प्रेरणा होते पाडगावकर. त्यांच्या मतानुसार मी लिहीत आहे. कोणाला आवडेल नाही आवडेल त्याची फिकीर नाही मला. एखाद्यानं आवडलं म्हणून केलेलं कौतुक मात्र मला नव्याने लिहायला हुरूप देईल. 
                        मी आज जे लिहितो त्यामागची ही प्रेरणा आज जगातून निघून गेली असली तरी ती शब्दांतून तशीच सोबत आहे. मराठी साहित्यातलं एक पर्व काल संपलं. साहित्यातही घराणी असतात ना त्याच घराण्यातलं शेवटचं पिकलं पान काल गळून गेलं. कवितेचा पणजोबा काल पोरका करून गेला. वसंत बापट(१८ सप्टेंबर २००२),  विं दा करंदीकर (१४ मार्च २००८),  कवी ग्रेस (२६ मार्च २०१०) अन आता मंगेश पाडगावकर (३० डिसेंबर २०१५) हे कवितेचे सगळे पणजोबा एकेक करत निरोप देत गेले. साहित्य क्षेत्रातली ही बाप माणसं मराठी साहित्याला पोरकं करून गेली. हा अखेरचा दीपस्तंभ काल विझला आहे. सरत्या वर्षाचा निरोप घेत सरत्या आयुष्याचाही निरोप घेतला. आपल्या शब्दालंकाराच्या विलक्षण जादूला इथं सोडून.  
                         कोणी विचारलं ना तुम्ही काय गमावलं तर आम्ही आमच्या जीवनाच्या प्रत्येक रंगछटा उलगडून दाखवणारा राजहंस गमवला. आपल्या शब्दातून आधाराचे शब्द देणारा मित्र गमवला. 
                          सुख दुःख, आनंद, प्रेम या प्रत्येकाचं तत्वज्ञान समजून सांगणारा तत्वज्ञ गमवला.  आयुष्याचं जीवणगाणं सांगत जगण्याची दिशा दाखवणारा वाटाड्या गमवला. एक मितवा गमावला. जगण्यावर शतदा प्रेम करायला लावणारा प्रेरणास्त्रोत गमवला. कवितेच्या वाटेवरचा एक दीपस्तंभ गमावला.
.
.
.
जीवनासारखाच मरणाचाही आनंद घेणाऱ्या या माझ्या कवितेच्या द्रोणाचार्याला भावपूर्ण आदरांजली.

आयुष्याचे जीवनगाणे मी माझे गात जावे...




गणेश दादा शितोळे
(३१ डिसेंबर २०१५)