माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, २७ मार्च, २०१३

मैत्रीणीची प्रतिक्रिया


                 नुकतेच मित्राच्या लग्नात जूने क्लासमेट्स भेटले. बरं वाटलं. एकमेकांची विचारपूस झाली. कोण काय करते समजले. आजच्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून माझ्यातीलही लेखणाचं एक वेगळं अंग मित्र परिवाराला समजलं. अनेक मित्र मला फाॅलोही करतात. अनेकांना लिहिलेले आवडते तर काही खटकते. काहींनी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या. बर्‍या वाईट दोन्हीही. अनेकांकडून प्रतिक्रिया मिळण्याची अजूनही वाट पहात आहे.  याच लग्नादरम्यानही काही मित्र मैत्रिणींनी प्रतिक्रिया दिल्या. त्यातलीच एका मैत्रिणीची प्रतिक्रिया होती. 

"मी तुझ्या कविता वाचते. पण अनेकदा त्यांचा कंटाळा येतो. किती मोठ्या लिहितोस रे. जरा लहान लिहित जा. चांगल्या वाटतात."
                   त्यावेळी फक्त एक स्मितहास्य करून मी हो असंच उत्तर दिले.  पण त्यानंतर मात्र या प्रतिक्रियेचा गांभीर्यानं विचार केला. काही दिवस एखाद्या विषयावर थोडं लिहायचा प्रयत्नही केला. पण एखाद दुसरी वेळ वगळता ते जरा जास्तच होत होते. त्या काही दिवसात लिहीताना प्रत्येक वेळी हाच विचार आला की मी ठरवून तर काही लिहित नाही अन लिहू शकणार नाही. ज्या वेळी जे सूचते त्यावेळी ते लिहिले जाते. कधी ते लांबलचक होते तर कधी थोडक्यात होऊन जाते.
             आजही हे थोडक्यातच मांडतो. पण हे खरंय की लिहिणारा तेव्हाच लिहायचं थांबवतो ज्यावेळी त्या विषयावरचा विचार थांबतो. आणि जर आपल्या मनाने कधी बंधनं घालून घेतली नाहीत तर आपण आपल्या विचारांना बंधनं का घालावी किंवा  कशी घालणार..?
                 असो. बघू जेवढं जमेल थोडक्यात लिहीन ते तिला आवडेल. बाकी आहेच मग आठवणींच्या वहीत तसंच पडून राहणारं...दुसरं कोणाच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.....

गणेशदादा शितोळे 
(२७ मार्च २०१३)


मंगळवार, १२ मार्च, २०१३


आठवणीत आहे तू मी अन अविस्मरणीय केरळ....









आठवता आहे सोबत घालवलेला कोझिकोडे मधला वेळ. ..
सोबत खाल्लेली मराठमोळी पानीपुरी अन भेळ...
आयुष्यात पहिल्यांदा जुळला होता नात्यामधला मेळ...
आठवणीत कायम आहे तू मी अन अविस्मरणीय केरळ....


आठवतोय तो अथांग निळाशार समुद्र. ..
गप्पांच्या क्षणात रंगून गेलेला चौपाटीवरचा पावलांचा प्रवास
अन सोबत घालवलेली ती रम्य संध्याकाळ....
आठवणीत कायम आहे तू मी अन अविस्मरणीय केरळ....


आठवतोय तो कन्याकुमारीतला
रंगाची उधळण करीत मावळणार्‍या सूर्याचा खेळ...
होती ती एक तीन सागरांच्या मिलनाची सांजवेळ...
लक्षात राहीला तोही एकत्र घालवलेला वेळ....
आठवणीत कायम आहे तू मी अन अविस्मरणीय केरळ....


गणेश दादा शितोळे
(१२ मार्च २०१३)