ऑफिसमधे काम करत असताना दुपारी नोटीपिकेशन
मधे आलेली बातमी वाचली अन एकदम धस्स झालं. डॉ. गिरीश कर्नाड गेले. खरंतर आमचा तसा
अर्थाअर्थी काहीच संबंध नव्हता. ना कधी त्यांची माझी प्रत्यक्ष भेट झाली ना कधी
कुठे संबंध आला. पण तरीही डॉक्टरांचं जाणं हा माझ्यासाठी फार मोठा धक्का होता.
कर्नाड माझ्या म्हणजे साहित्यक्षेत्रातील असल्याने त्य़ांच्या आठवणी माझ्या मनात
कायम जिवंत राहतील.
भारतीय राजकारण, समाज व्यवस्था, जातीव्यवस्था, धर्म व्यवस्था
यांच्यावर डॉक्टर साहेब कायम बोलायचे. आयुष्यात त्यांनी सतत उदारमतवाद, समानता या
तत्त्वांचा नेहमीच पुरस्कार केला. या तत्त्वांसाठी लढण्यासाठी ते रस्त्यावरदेखील
उतरले. म्हणूनंच त्यांच्या प्रवासवाटेवरून चालताना डॉक्टर साहेब कायमंच प्रेरणेचे
झरे ठरले. लेखक जे लिहितो ते प्रत्यक्ष कृतीत आणतो असं फार कमी घडतं पण डॉक्टर
साहेब जे करायचे तेच लिहायचे बोलायचे. परंतु मी तो कमनशीबी माणूस आहे की ज्याने
त्यांच्याविषयी फार कमी वाचलंय. भारतीय सांस्कृतिक घडामोडीतील आणि भारतीय
रंगभूमीकरता योगदान दिलेला एक अतिशय विद्वान माणूस म्हणजे डॉ. गिरीश कर्नाड. अशी
जगाकरता ओळख असली तरी मला डॉक्टर कायम अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अत्यंत मोठा
पुरस्कर्ता वाटत राहिले. मध्यांतरी गळ्यात पाटी घालून चित्रपटगृहात लेखकांच्या
गळचेपीचा निषेध केला ते हेच दाखवून गेला.
माणसाने कायम बोलत राहिले पाहिजे. कधी ते
स्वत:शी असेल तर कधी इतरांशी असेल. पण माणसांनं बोलायला हवं. कोणतीही गोष्ट
करायच्या आधी ती का करायची हे विचारता आलं पाहिजे. हा का विचारायला मी शिकलो यात
डॉक्टर साहेबांचं योगदान महत्वाचं आहे. आयुष्याचं जगण्याचं “प्रयोजन” काय ? हे लक्षात आलं तर माणसाचं जीवण सत्कारणी
लागते. अन्यथा त्याचं त्यालाच कळत नाही का जगतोय ते.
डॉक्टरांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी
आली. पण ते कधी डगमगले नाहीत. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशी अनेक विद्वान माणसं या
देशात केवळ विचार पटत नाहीत म्हणून मारली गेली. त्यातून सटून डॉक्टर गेले तरी
त्यांच्या मागची साथ या विद्वेषी लोकांनी सोडली नाही. सोशल मिडीयावर अशा विद्वेषी
लोकांनी जे काही अकलेचे तारे तोडले ते पाहून वाईट वाटले. माणूस हे जग सोडून
गेला तरी त्याच्या विषयीचा द्वेष कायम रहातो तिथे बुद्दीची कीव वाटली. असो.
गांधीना नथुरामला मारलं. संपला नथुरामंच. गांधी कायम जगाच्या मनामनात चिरतरूण
राहिले. तसेच डॉक्टर पण चिरतरूण रहाणार. बाकी विद्वेषी पिलावळी जन्मला येणार आणि
मरणार. त्यांना विचारतंय कोण..
गणेश सुवर्णा तुकाराम
११ जून २०१९
