सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली
सध्याच्या परिस्थितीत टिव्हीवर बसून फुकटचे सल्ले देण्यात जसा आजी माजी खेळाडूंचा सुकाळ पडला आहे तसाच पत्रकारांचाही सुकाळ पडलेला आहे. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांची तुलना करण्याचे धाडसे हेच महाभाग फक्त करू शकतात. दोघांचाही खेळ आणि परिस्थिती लक्षात घेतली असता ही तुलना म्हणजे केवळ मुर्खपणा ठरतो. सचिन तेंडुलकरने कारकीर्दीत सामना केलेल्या गोलंदाजांच्या तुलनेत आज एकही विरोधी संघाचा गोलंदाज सापडण्याकरता संशोधनाची आवश्यकता पडेल. वकार आणि वसिम सारखे रिव्हर्स स्विंग याॅर्कर आज अपवादानेही पहायला मिळत नाहीत. पण हेच यॉर्कर लिलया खेळून सचिन तेंडुलकर यशस्वी होत घडला. शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरण, जाईल्स, सकलेन मुश्ताक, मो. रफीक यासारख्या अफलातून फिरकी गोलंदाजांना सचिन तेंडुलकरने नेस्तनाबूत करत कारकीर्द घडवली. अनेक विक्रम नोंदवले तरी भारताच्या विजयात सचिन तेंडुलकरचा फारसा वाटा नसायचा हे खरे आहे पण त्यामागची परिस्थिती समजून घ्यायला हवी. सचिन तेंडुलकरच्या २२ वर्षांच्या कारकीर्दीत जवळपास तितकेच कर्णधार आणि प्रशिक्षक बदलले गेले. क्रिकेट हा सांघिक खेळ असल्याने विजय हाही सांघिक असतो. केवळ एखाद्या खेळाडूने खेळ करून विजय मिळविता येत नाही, सोबत कर्णधाराची कामगिरी आणि योग्य प्रशिक्षणाचीही आवश्यकता असते. कारण प्रशिक्षकाच्या सल्ल्याने कर्णधार रणनिती तयार करत असतो आणि विजय मिळविला जातो. त्यामुळे बदलत्या कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या गर्तेत सचिन तेंडुलकरच्या अनेक खेळी विक्रम नोंदवू शकल्या. पण विजयात योगदान देऊ शकल्या नाहीत. सोबतच विरोधी संघातील खेळाडूंची कामगिरीही एका सर्वोत्तम पातळीवर असल्यानेही सचिन तेंडुलकरच्या अनेक खेळी भारतीय संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशा ठरल्या नाहीत.याउलट विराट कोहलीच्या कारकीर्दीचा विचार केला तर विराट कोहलीच्या कारकीर्दीत भारतीय संघाला सर्वोत्तम कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनी, सर्वोत्तम प्रशिक्षक गॅरी कर्स्टन, डंकन फ्लेचर व टिम मॅनेजर रवी शास्त्री लाभले. परिणामी गॅरी कर्स्टन आणि नंतर रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली धोनी मैदानावर यशस्वी रणनिती रचत राहिला आणि त्यामुळेच विराट कोहलीच्या अनेक खेळी भारतीला विजय मिळवून देणार्या ठरल्या. विराट कोहली निश्चित तितकाच तोडीचा फलंदाज आहे. जसा सचिन तेंडुलकर आहे. पण दोघांनची तुलना कधीच शक्य नाही. दोघांनीही आपल्या वडिलांच्या निधनानंतरही एक सर्वोत्तम खेळ करत संघाला विजय मिळवून दिला हा फक्त योगायोग आहे. उगाच तो दाखला देऊन दोघांची तुलना करणे योग्य होणार नाही. नक्कीच सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडण्याची धमक विराटमधे आहे अन काही विक्रम त्याने मोडलेही. पण सचिन तेंडुलकर याने ज्या परिस्थितीत त्या खेळी साकारत विक्रम रचले गेले तशी परिस्थिती आजची नाही. आजच्या घडीला खेळाडूंना अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गोलंदाजांनाही अनेक निर्बंध लागू करण्यात आलेत.
पॉवरप्ले सारखे प्रकार हे फलंदाजांना मोकळे रान उपलब्ध करणारे आहेत. या अशा सुविधापूर्ण आणि उपयोगी नियमांच्या परिस्थितीत विराटने सर्वोत्तम कामगिरी करत विक्रम मोडले. त्यामुळे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची तुलना होऊ शकत नाही. अनेक चाहत्यांना सचिन तेंडुलकरची पाकिस्तान सोबतची पहिली मॅच आठवत असेल. वकार आणि वसिम च्या बाऊंसरचा ओपन हेल्मेटमुळे तडाखा सहन करत जायबंदी झालेला सचिन सोळा सतरा वर्षी एक अविस्मरणीय ५७ धावांची खेळी करून नवज्योत सिद्धू सारख्या आपल्या जेष्ठ सहकर्यालाही प्रेरणा देऊन जातो यातच त्याचे मोठेपण आले.
वेस्ट इंडिज सोबतच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात धोनीने विराट कोहलीला ओव्हर दिली आणि अनेकांना हिरो चषकाच्या विजेतेपदाच्यावेळीची फायनल आठवली. अन लगेच तेंडुलकरच्या आणि विराट कोहली यांच्या तुलनेला सुरवात झाली. पण फरक असा होता की त्यावेळीस आफ्रिकेला जिंकण्यासाठी केवळ सहा चेंडूत तीन धावा हव्या असताना भारताला विश्वचषक जिंकून देणारा कपिल देव असतानाही सचिन तेंडुलकर सारखा तरूण खेळाडू कर्णधाराकडून मागून शेवटचे षटक टाकतो. पुढे काय झाले ते माहित आहेच. सचिन तेंडुलकरने तीन गडी बाद करत यशस्वीपणे तीन धावाही रोखल्या आणि भारत जिंकला. याउलट विराट कोहली च्या शेवटच्या षटकात विंडीज विजयी झाले. तेव्हा पुन्हा सर्वांना परिस्थितीची जाण झाली. दोन्ही वेळेला परिस्थिती वेगळी होती अन त्या त्या परिस्थितीत सचिन तेंडुलकर यशस्वी झाला तर विराट कोहली अपयशी ठरला. हाच तो दोघातील फरक आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे दोन दिग्गज आणि तोडीचे खेळाडू असले तरी दोघांची तुलना होऊ शकत नाही.
दुसरा मुद्दा असा की अनेक पत्रकारांना भारताच्या जय पराभवात मोठी भूमिका बजावणारी खेळपट्टी भारतीय संघाच्या अनुकूल करून घेण्याची भूमिका खटकते. संघ व्यवस्थापन आणि कर्णधार जर यजमान नात्याने आपल्याला अनुकूल खेळपट्टी तयार करण्याची मागणी करत असेल तर ते पत्रकार आणि आजी माजी खेळाडूंना खटकण्याचं कारण नाही. जर भारतीय संघ परदेशात खेळण्याकरता जातो तेव्हा यजमान देश त्यांच्या मजबूत वेगवान गोलंदाजीला अनुकूल अशा हिरव्या आणि टणक खेळपट्ट्या तयार करून घेतो आणि विजय मिळवतो. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातलं पानिपत हे याच कारणामुळे झाले. २००७ ला वेस्ट इंडिज आणि २०१५ ला ऑस्ट्रेलिया दोन्ही वेळा वेगवान खेळपट्टीवर भारतीय संघाची सपशेल शरणागती झाली. त्याला कारणे अनेक असतील. पण जर इतर देश भारताला परदेशात खेळताना वेगवान खेळपट्ट्या देत असतील तर भारतीय संघाने भारतात फिरकी खेळपट्ट्याची मागणी करण्यात गैर नाही. आपण आपल्या गुणवैशिष्टय़ांना ओळखून तयारी करायला हवी.
शेवटी इतकंच की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. कोणत्याही एका खेळाडूच्या बळावर विजय मिळवणे शक्य नाही. त्यामुळे संघातील सर्वच खेळाडूंनी एकत्र येऊन आपापली कामगिरी केली तर विजय मिळविता येतो. सोबतच त्या दिवशी ज्या संघातील खेळाडूंचा खेळ उंचावेल अन सर्वोत्तम होईल तोच संघ जिंकतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वेस्ट इंडिज सर्वोत्तम कामगिरी करून जगजेत्ता झाला. भारतीय संघाचाही खेळ चांगला झाला. काही खेळाडू अपयशी ठरले असले तरी सर्वांनी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. कोणी जाणूनबुजून वाईट खेळ करत नसतो हेही लक्षात घ्यायला हवं. आपल्याही संघातील सगळेच खेळाडू मॅचविनर आहेत. फरक इतकाच की प्रत्येकाचा चांगला टाईम अन बॅडपॅचही वेगवेगळ्या वेळी येतो. अन हाच बेस्ट टाईम जुळून आल्यानेच अनेकदा भारतीय संघाने विजेतेपद पटकाविली आहेत. हा विश्वचषक गेला. पुढील विश्वचषकाची वाट बघायची. संघ व्यवस्थापन आणि कर्णधार आपल्या चूका शोधण्याचा आणि त्यावर मात करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहेत. पुढच्या वेळी नक्की विश्वचषकावर नाव कोरले जाईल असा विश्वास ठेवून आपल्या भारतीय संघाला अश्याच शुभेच्छा देत पाठीशी उभे राहावे.
गणेशदादा शितोळे
(६ जून २०१७)




