माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, ३ मे, २०१४

तिच्या आठवणीत.....



डोळ्यांना सांगितलंय मी आज ओंगळवाणं पाहू नको...
आज तिला आठवणीत पहायचं आहे....
पापण्यांना सांगितलंय मी आज मिटू नको
आज तिच्या आठवणीत जागायचं आहे....

गालाला सांगितलंय मी आज खळी पडून देऊ नको...
आज तिच्या गालावरच्या खळीला बघायचं आहे...
ओठांना सांगितलंय मी आज ठम्म बसून रूसू नको...
आज तिच्या ओठांवरच्या हास्याला बघायचं आहे...

मनाला सांगितलंय मी आज कोणाला अलिंगन देऊ नको...
आज तिला मिठीत घ्यायचं आहे..
ह्रदयाला सांगितलंय मी आज जास्त धडधडू नको...
तिच्या आठवणीत तुला खूप धडधडायचं आहे....

शब्दांना सांगितलंय मी आज फार काही सुचवू नको...
तिच्या आठवणीत बरचं काही सुचणार आहे...
कवितेला सांगितलंय मी आज शब्दांतून काही बोलू नको...
आज आठवणीत का होईना  तिच्याशी बोलायचं आहे...

भावनांनाही सांगितलंय आज मनाच्या कोपर्‍यात दडून राहू नको..
आज तिच्याबद्दलच्या सर्व भावनांना वाट करून द्यायचं आहे...
आसवांना सांगितलंय मी आज नुसतेच गालावरून ओघळू नको..
आज तिच्या विरहाच्या आठवणीत मनसोक्त रडायचं आहे....


गणेश दादा शितोळे
(३ मे २०१४)