माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, ६ जानेवारी, २०१३

माझ्या दृष्टीकोनातून ...

                        आपण आपल्या आयुष्याचं कायम परिक्षण केले पाहिजे. त्यातून आपल्याला आपल्या चुका आणि सोबत बरोबर गोष्टींचा उलगडा होतो. आयुष्य परिक्षण केल्याने गुंतागुंतीचं होतं असं मला नाही वाटत. उलट ज्या क्षणी आपल्याला गुंतागुंतीतून योग्य मार्ग काढायचा असतो तेव्हा आपण आयुष्याचं परिक्षण करतो आणि जुन्या चूकीची पुनरावृत्ती टाळून मार्ग शोधतो. 

                       आयुष्य कधीच त्रासदायक नसतं. आपण आपल्या सोयीनुसार आपल्या प्राधान्य क्रमात आयुष्याला बंधनात गुंतवून ठेवतो. आणि मग ओरडतो की आयुष्यात मोकळा वेळ मिळत नाही. पण आपण हे विसरून जातो की मनाने कधी बंधने घालून घेतलेली नसतात. त्यामुळे आपण आपल्या आयुष्याला आकार देत असताना विचार केला तर ही वेळ येत नाही. 

                         मला कायम वाटतं आपण ध्येयवेडेही अन ध्येयवादीही असता कामा नये. आयुष्यात कायम दुःखी असण्यामागचं कारण हेच ध्येय असते. कारण ते ध्येय गाठण्याकरता आपण धडपड करतो. अनेक संकटं येतात. आणि त्याचा सामना करताना दुःखाला सोबतीला घेतो. कारण पुढे आनंद आहे. पण जेव्हा ते धेय्य गाठले जाते तेव्हा तो आनंद घेण्याअगोदर आपण पुढचं धेय्य ठरवतो आणि पुन्हा एकदा जुन्या वाटेनेच प्रवास करतो. मला हे मिळाले याचा आनंद नसतो तर मला हे मिळायला हवे ही अपेक्षा असते. आणि हीच अपेक्षा कायम दुःख देणारी ठरते. आहे त्यात समाधानी असले की आपल्याला आनंद वेगळा साजरा करण्याची आवश्यकता नसते.

                           त्यामुळे धेय्यवादी असण्यापेक्षा मला प्रयत्नवादी असावे असेच वाटते. आपण प्रयत्न करत रहावे. काही मिळेल ते आयुष्याकडून मिळालेलं सरप्राईज म्हणून स्विकारावे. त्याचा अधिक आनंद असतो. .

                            आयुष्यात यशापेक्षा अपयशच कायम मिळावे. कारण अपयशाची प्रत्येक वाट मला यशाचा बरोबर मार्ग दाखवत प्रयत्न करयला स्फूर्ती देत असते. मी यशाचा मार्ग शोधू शकलो नाही तरी अपयशाने यशापासून भरकटलेल्या अनेक वाटा सापडतात. आणि प्रत्येक अपयशी वाट मला आयुष्याचा वेगळा अनुभव शिकवते. म्हणूनच मला कधीही यशस्वी लोकांच्या गोष्टी आवडत नाहीत. यशोगाथा कधीही प्रयत्नांना स्फुरण देत नाहीत. कारण या यशोगाथा यशाचा एक बरोबर मार्ग मला अनुभवहीन करून जातात. आणि मग पुढे या अनुभवांची कमतरता जाणवते. मग आयुष्यात एका वेळी वाटतं आपलं हे करून पहायचं राहिलंच. म्हणून आयुष्यात जे काही वैविध्यवान करता येईल ते करावे. प्रत्येक वेळी यशाची अपेक्षा का धरावी.? आयुष्याकडून कधी ना कधी अचानक ते आपल्या झोळीत पडणार आहे. आपण फक्त प्रयत्न करत रहावेत. कारण अनुभव मिळण्यासारखी यशस्वी गोष्ट दुसरी कोणती वाटत नाही. त्यामुळे घेता येईल तो प्रत्येक अनुभव घेऊन वाटचाल करायला हवी.

गणेशदादा शितोळे
(६ जानेवारी २०१३)